बीड - मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्ह्यातील सरपंचांनी पुढाकार घेऊन कोरोनाविरुद्ध लढाईमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक सरपंचांनी आपल्या गावातील लोक मास्क वापरतात का? इतर नियमांचे पालन करतात का? यासाठी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात देखील कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असे ते यावेळी म्हणाले.
बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, आ. संदीप क्षीरसागर यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना तीन राऊंड फायर करून अभिवादन करण्यात आले. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम आता आपण राज्यभरात राबवत आहोत. प्रत्येकाने स्वतः ची जबाबदारी ओळखून कोरोनावर मात करण्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे मुंडे म्हणाले. ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्यांची भेट घेतली.
शिक्षकांनी केली अनुदानाची मागणी - मागील दहा वर्षापासून विनाअनुदान तत्वावर काम करत आहोत. शासनाने आतातरी आम्ही ज्या शाळेवर नोकरी करतो, त्या शाळेला अनुदान देऊन द्यावे, अशीही मागणी यावेळी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी महिला शिक्षकांची उपस्थित होती.