परळी वैजनाथ (बीड) - राज्यातील व जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांकसाठी किमान एक दिवस स्वतंत्र लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडेंनी मंत्री धंनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना रविवारी (दि.२३) दिले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीकरणास राज्यातील व जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गर्दीत दिव्यांग नागरीकांना लस घेण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना लस मिळत नाही. आपल्या खात्यातून काढलेल्या आदेशाला लसीकरण करताना प्राधान्य दिले जात नाही. दिव्यांग बांधवांची शारीरिक क्षमता अगोदरच कमी असते. त्यांना कोरोनाचा लवकर संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे त्यांना लसीकरणाची गरज आहे. याचा विचार करुन पालकमंत्री या नात्याने आपण जिल्ह्यात दिव्यांगासाठी लसीकरण मोहीम राबवावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी सांगितले.