बीड - यंदा मतदारसंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. मी व माझे कार्यकर्ते कायम जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर असतो. ज्या काकाने माझ्यावर अन्याय केला, त्यांच्या विरोधात मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभा आहे. जनतेने माझ्या पाठीशी उभे राहून आशीर्वाद द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीचे उमदेवार संदीप क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या भव्य प्रचंड रॅलीचे बागलाने इस्टेट येथे जाहीर सभेत रुपांतर झाले. यावेळी 'तुम्ही विकासाच्या गप्पा मारता'; 2012 मधली कामे 2017 मध्ये झाली, असे ते म्हणाले.
आम्ही शहराचे राखणदार म्हणून काम करत आहोत. पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना लोकांचे हित पाहिले असून, आमच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोपही तुम्ही सिध्द करु शकला नासल्याची टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
बोलायला काही नसल्यामुळे तुम्ही चारित्र्यावर येता. यापुढे चारित्र्याची भाषा केल्यास पत्रकारांच्या समोरच आमने-सामने बसून तुमच्या अनेक गोष्टी आमच्याकडे बाहेर काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार सय्यद सलीम, उषाताई दराडे, सुनिल धांडे, जनार्दन तुपे, अॅड.डी.बी.बागल, रविंद्र क्षीरसागर, बाबुसेठ लोढा उपस्थित होते.