बीड - खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज बीडच्या गेवराई तालुक्यात पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. कुंभारवाडी शिवारातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. परतीच्या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करणे अपेक्षित आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
कुंभारवाडी शिवारातील शेतकऱ्यांनी खासदार संभाजीराजे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे कोरोनाच्या संकटात असतानाही शेतकऱयांनी उसनवारीकरून पेरणी केली. प्रमाणात पाऊस असल्याने पीकेही जोमात आली होती. मात्र, परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे आता कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याचे शेतकऱयांनी सांगितले.
'मायबाप सरकारने या संकटातून आम्हाला बाहेर काढावे', अशी विनंती कापूस उत्पादक शेतकरी बाबुराव तळेकर यांनी केली. या पीकपाहणीवेळी संभाजीराजे यांच्यासोबत गेवराई तालुक्यातील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन पूर्णपणे खराब झाले आहे. कापूसाची बोंडेही भिजली आहेत. काही ठिकाणी पावसाच्या पाण्यासोबत शेतातील मातीही वाहून गेली आहे.