बीड - मागील पाच वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळी स्थिती आहे. अशा परिस्थितीत बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. या सगळ्या बाबींचा विचार करून राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जूनमध्ये पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, याशिवाय शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क देखील माफ करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा अध्यक्ष राहुल वाईकर यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
येत्या आठवड्याभरात राज्य सरकारने हा शेतकऱ्यांबाबतचा निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन संभाजी ब्रिगेड मराठवाड्यात करेल असा इशाराही राहुल वाईकर यांनी यावेळी दिला आहे.
बीड जिल्ह्यात सहा लाखांवर शेतकऱ्यांची संख्या आहे. मागील सहा वर्षांपासून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाचा परिणामाने बळीराजा हतबल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना मागील तीन-चार वर्षात शेतातून काहीच उत्पन्न मिळाले नाही. ही सगळी वस्तुस्थिती पाहता राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी बीड येथील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल वाईकर यांनी बीड जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सध्या बीड जिल्ह्यात साडेनऊशेहून अधिक टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अत्यंत दूषित पाणी सर्वसामान्य नागरिकांना टँकरद्वारे दिले जात आहे. याचा परिणाम नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची भीती गावागावांमध्ये निर्माण झाली आहे. सध्या डेंगु, मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. या सगळ्या परिस्थितीला बीड जिल्हा प्रशासन पुरवठा करत असलेले दूषित पाणी हेच मूळ कारण असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
शैक्षणिक शुल्क माफ करा-
मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मुले केवळ पैसे नाहीत म्हणून शहरातून गावाकडे शिक्षण सोडून आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मुलांना शुल्क माफी द्यावी, अशी मागणी देखील लावून धरण्यात आली. यावेळी बीड जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.