बीड - जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी धमकावले असल्याचे सांगत महसूल कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. पाटोदा तालुक्याच्या तहसीलदार रूपा चित्रक यांनी महसूल कर्मचाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याबाबत महसूल संघटनेचे कर्मचारी जिल्हाधिकारी कुमार पांडे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांनी धमकी दिल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
'मंत्र्यांकडे अधिकाऱ्यांची तक्रार कराल तर याद राखा, एकेकाला आत टाकेल' अशी धमकी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असल्याचे महसूल कर्मचाऱ्यांनी सांगितले. याबाबत कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आमच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप करत शनिवारपासून बेमुदत बंद आंदोलन छेडले आहे. सध्या शेतकऱ्यांचा पीक विमा भरणे तसेच कर्ज घेणे अशी कामे सुरू आहेत. मात्र, या काम बंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांच्यावतीने विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील तहसीलदार रूपा चित्रक यांनी पाटोदा तालुक्यातील वाळू वाहतूक प्रकरणी कर्मचाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. तहसीलदारांकडून पाटोदा येथील महसूल कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, यासाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचारी पांडे यांच्याकडे गेले होते. मात्र, त्यांनी कर्मचाऱ्यांना वेळ दिला नाही. पर्याय म्हणून बैठकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना भेटून निवेदन देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना पांडे यांनी धमकी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या धमकीमुळे संबंध बीड जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. एवढेच नाही तर मागील काही दिवसापासून जिल्हाधिकारी हे कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे काम करत आहेत. असे निवेदनात म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी या प्रकारामुळे आपले नियमित कर्तव्य बजावू शकत नाहीत. माननीय आयुक्तांनी कर्मचाऱ्यांविरुद्ध खोटी फिर्याद देणाऱ्या रूपा चित्रक यांना निलंबित करावे आणि निर्दोष कर्मचाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने निवेदनात करण्यात आली आहे.
महसूल संघटनेने पुकारलेल्या काम बंद आंदोलनात महसूल कार्यालयातील पदोन्नत अधिकारी, कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, वाहन चालक, शिपाई, कोतवाल इत्यादी सर्व कर्मचारी सहभागी होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.