बीड - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मागील दीड महिन्यांपासून बीड जिल्ह्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. 1 जूनपासून यात जिल्हा प्रशासनाने शिथिलता देत सकाळी 7 ते 11 यादरम्यान अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
राज्य शासनाने ज्या त्या जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन त्या-त्या जिल्ह्यासाठी वेगवेगळे नियम घालून दिले आहेत. 15 जूनपर्यंत बीड जिल्ह्यात निर्बंध राहणार आहेत. यामध्ये थोडीशी शिथिलता आणत अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी परवानगी दिली आहे. मंगळवारी (दि. 1 जून) सकाळी सात वाजल्यापासूनच धुळे शहरातील रस्ते गजबजल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील सुभाष रोड, मोंढा मार्केट, नगर रोड, जालना रोड आदी भागात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
अशी आहे बीड जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती
बीड जिल्ह्यात रुग्णदरवाढीचा दर 16.13 टक्के एवढा आहे तर मृत्यूदर 2.26 टक्के आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात 1 हजार 953 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 91.99 टक्क्यांवर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 86 हजार 55 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 79 हजार 163 जण कोरोनामुक्त झाले आहेत. अजूनही बीड जिल्ह्यात प्रतिदिनी सुमारे पाचशे ते साडेसहाशेच्या दरम्यान कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात विशेष काळजी घ्यावी लागणार असल्याने 15 जूनपर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे.