बीड - जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातून प्रसूतीसाठी गर्भवती महिलांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात गर्भवती महिलांची मोठी गर्दी होत आहे. कोरोनाच्या आधी दररोज 50 ते 60 गर्भवती माता प्रसूतीसाठी दाखल होत होत्या. मात्र आता हाच आकडा 75 ते 100 पर्यंत गेला आहे. परिणामी शासकीय रुग्णालयात गर्दी वाढलीय. जुलै महिन्यात सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या गर्भवती मातांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाचा स्थलांतरित डिलिव्हरी वॉर्ड हा 100 खटांचा आहे. सध्या कोविडमुळे खासगी रुग्णालयात अन्य छोट्या-मोठ्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र हा वॉर्ड अपुरा असल्याचे चित्र शनिवारी जिल्हा रुग्णालयात पाहायला मिळाले. खासगी रुग्णालयात गरोदर मातांची प्रसूती करण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मात्र सध्या गर्भवती मातांमध्ये सर्दी, खोकला किंवा अन्य काही लक्षणं आढळल्यास त्यांना खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात रेफर केले जात आहे. परिणामी 100 खाटांच्या वॉर्डात दीडशे ते पावणे दोनशे गरोदर महिलांना वाट पाहावी लागतीय. गर्भवती महिलेसोबत नातेवाईक देखील असल्याने आणखी संख्या वाढत आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने गरोदर मातांसाठी खाटांची संख्या वाढवणे अपेक्षित आहे. शहर आणि ग्रामीण भागातील सर्व स्त्रीरोग तज्ञांना गरोदर मातांच्या प्रसूतीसंदर्भात सूचना दिल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले.
फक्त बीड जिल्हा रुग्णालयात जानेवारी 2020 मध्ये एकूण 612, फेब्रुवारी 549, मार्च 610, एप्रिल 565, मे 593, जून 570 तर चालू महिन्यात म्हणजेच 20 जुलै पर्यंत 500 पेक्षा अधिक गरोदर मातांच्या डिलेव्हरी झाल्या आहेत. यावरूनच शासकीय रुग्णालयातील आकडा वाढल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. एकंदरीतच जुलै महिन्यात जिल्हा रुग्णालयात डिलिव्हरीसाठी दाखल होणाऱ्या गरोदर महिलांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.