बीड- प्लास्टिक पिशव्यांना बंदी असताना देखील बीड शहरातील एमआयडीसी भागातील एका कारखान्यात प्लास्टिकच्या पिशव्या बनविल्या जात होत्या. या कारखान्यावर सोमवारी बीड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून तब्बल पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच प्लास्टिक पिशव्या बनविणाऱ्या व्यापाऱ्याला १५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला असल्याची माहिती बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी सांगितले.
बीड शहरातील एमआयडीसी भागात दीपक गोडाऊन या ठिकाणी राठी नावाच्या एका व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या तयार केल्या जात होत्या. प्लास्टिक पिशव्यांना बंदी असताना देखील पिशव्यांचे उत्पादन केले जात असल्याची माहिती बीड नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळताच सोमवारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी छापा टाकत कारवाई केली.