बीड (अंबाजोगाई) - किसान काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प केला आहे. गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेच्या विविध प्रश्नांवर किसान काँग्रेसच्या वतीने (१९ जून, शनिवार) रोजी अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी हा संकल्प दीन साजरा करण्यात आला. याबाबतची माहिती अखिल भारतीय किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. माधव जाधव यांनी दिली.
मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
ॲड. माधव जाधव यांच्या नेतृत्वाखाली संकल्प दिनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. वाढती महागाई, इंधन दरवाढ, काळे कृषी कायदे कायदे, बेरोजगारी यासह सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी निगडित मुद्यांवर मोदी सरकारच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. तसेच निषेधाचे फलक झळकावून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ॲड. माधव जाधव, काँग्रेसचे राज्य समन्वयक संजय वाघमारे, माजी तालुकाध्यक्ष ॲड. अनंतराव जगतकर, माजी तालुकाध्यक्ष वसंतराव मोरे, माजी शहराध्यक्ष तारेख अली उस्मानी, माजी नगरसेविका बिलकीस कच्छी, युवक काँग्रेस परळी विधानसभेचे ईश्वर शिंदे, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष धनराज कोळगिरे, तालुका उपाध्यक्ष सतिश भगत, योगेश तट, अच्युतराव इंगळे, नागनाथ इंगळे, सिध्देश्वर स्वामी, भीमराज मोरे, शरद वाघमारे, उध्दवराव गंगणे आदी उपस्थित होते.
'२०२४ साली राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प'
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा आज (१२ जून) वाढदिवस आहे. प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांचे आदेशानुसार किसान काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांचा वाढदिवस 'संकल्प दिन' म्हणून राज्यासह संपूर्ण मराठवाड्यात साजरा केला जात आहे. या वाढदिवसाला उत्सवी स्वरूप न देता. केवळ त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मराठवाड्यातील गरजू कुटूंबांना रेशन, अन्नधान्य, औषधे, वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचेही ॲड. जाधव यांनी सांगितले आहे. कोरोना काळात अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्यामुळे अनेकांना बेरोजगारीला समोर जावे लागले. असे असताना पंतप्रधानांनी या काळात भारतीय जनतेच्या जिवाशी खेळ केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्वताःची प्रतिमा मोठी करण्यासाठी इव्हेंटबाजीवरच जास्त लक्ष दिले. मात्र, यापासून भारताला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांच्याशिवाय पर्याय नाही असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. २०२४ साली राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला असल्याचे ॲड. माधव जाधव यांनी सांगितले आहे.