बीड - यावर्षीचा पाऊसकाळ चांगला जाईल, असे अंदाज वर्तवले जात असून जिल्ह्यात पावसाने दमदार एंट्री करण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात सरी बरसल्या. दुपारी जवळपास अर्धा तास पाऊस झाला. पावसाळ्याच्या तोंडावर सलग दोन पाऊस झाले असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.
बीड शहर व परिसरात मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. पंधरा ते वीस मिनिटे समाधानकारक झालेल्या या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. जिल्ह्यात मान्सूनपूर्व सरी कोसळत आहेत. अनेक वर्षात पहिल्यांदाच रोहिणी नक्षत्रात पाऊस पडत आहे. आता शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यात या तालुक्यांमध्येही झाला पाऊस-दरम्यान सोमवारीही जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर मंगळवारी बीड शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली. दरवर्षी साधारण ७ जून नंतर जिल्ह्यात पावसाला सुरुवात होते. त्यानंतर शेतकरी खरिपाच्या पेरणीला सुरुवात करतात. सद्यस्थितीत शेतकऱ्यांकडून खरिप पेरणीपूर्व कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात खते, बी-बियाणे उपलब्ध झाले आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास बाजारपेठेत बियाणे खरेदीसाठी लगबग सुरु होईल. जिल्ह्यात खरिपात कापूस, सोयाबीन, तूर ही प्रमुख पिके घेतली जातात तर काही ठिकाणी मक्याचीही पेरणी केली जाते.