परळी (बीड) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तपासासाठी येथे दाखल झालेल्या पुणे पोलिसांच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोघांची चौकशी देखील केल्याची चर्चा आहे. परळी येथील पूजा चव्हाण हिने काही दिवसांपूर्वी पुण्यात आत्महत्या केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक परळीमध्ये आले आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत आहे. दरम्यान पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन पथके तयार केली आहेत. त्यापैकी एक पथक बीडला पाठवण्यात आले आहे, दुसरे पथक यवतमाळला पाठवले आहे, तर तिसरे पथक पुण्यात तपास करत आहे. दरम्यान तपासासाठी परळीमध्ये दाखल झालेल्या पथकाने पूजा चव्हाण आणि अरुण राठोड यांच्या कुटुंबांची चौकशी केली असून, पूजाशी संबंधित असलेल्या दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.
काय आहे प्रकरण -
पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी आहे. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती, अशी माहिती समोर येत आहे.