परळी वैजनाथ (बीड) - बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमधील एका मंत्र्यांशी संवाद साधणारा अरुण राठोड याचे कुटुंबीय परळी तालुक्यातील धारावती तांडा येथून गायब झाले आहेत. घराला कुलूप लावलेले असून ते आता नेमके कुठे आहेत. हे कोणालाच सांगता येत नाही.
परळी येथील पूजा चव्हाण हिने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून पुणे येथे आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आता वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. रविवारी अरुण राठोड याच्या परळी तालुक्यातील धारावती तांड्यावरील घराला कुलूप लावले असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पूजा चव्हाण हिची आत्महत्या की, हत्या याबाबत कुठलीही ठोस अशी माहिती समोर आलेली नाही. याशिवाय ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली. त्या क्लिपमध्ये अरुण राठोड याचा एका मंत्र्याशी संवाद असल्याचे बोलले जात आहे. असे असताना अरुण राठोड याच्या कुटुंबियांना याबाबत काही माहिती नाही. असे असतानाही रविवारी अरुण राठोड यांच्या राहत्या घराला कुलूप असल्याचे पाहायला मिळाले. त्याचे कुटुंबीय नेमके आता कुठे आहे. हे धारावती तांडा येथील ग्रामस्थांना देखील सांगता येत नाही.
काय आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण -
बीड जिल्ह्यातील परळीमधील पूजा चव्हाण या २२ वर्षाच्या तरुणीचा रविवारी (दि. ७ फेब्रुवारी) इमारतीच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. ही हत्या की आत्महत्या यावरुन समाज माध्यमांमध्ये कॅबिनेट मंत्र्यांचा या घटनेशी संबंध असल्याची चर्चा चालू आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातील राजकरण ढवळून निघाले आहे. या मुद्यावरून विरोधी भाजप आक्रमक झाली असून त्यांनी संबंधित मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
तरुणीचे काही कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यावरुन पूजाने एका मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असून पूजाच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील अनेक गोष्टी दडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय भाजपने व्यक्त केला आहे.
तिच्या आत्महत्येनंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या पूजासोबत बोलतानाच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कथित दहा-बारा क्लिपही व्हायरल झाल्याने राज्यभरात हा विषय तापलेला आहे.