बीड - भाजपच्या आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे (स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सूतगिरणीचे चेअरमन) यांनी बनावट स्वाक्षरी करून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठोंबरे दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने 9 सप्टेंबर 2019 ला दिले होते. त्यानुसार केज पोलिसांनी ठोंबरे दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - बीड जिल्ह्यात हरणाची शिकार, दोघांना अटक
केजच्या भाजप आमदार संगीता ठोंबरे यांनी 2 वर्षांपूर्वी केज येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सूत गिरणी नावाने नवीन सूतगिरणी उभारण्याचे काम हाती घेतले. या सूतगिरणीचे काम अद्याप सुरू आहे. याच सूतगिरणीवर संचालक म्हणून गणपती सोनाप्पा कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीची पूर्वकल्पना अथवा त्यासाठी त्यांच्या लागणाऱ्या स्वाक्षऱ्या घेण्याची तसदी या दांपत्याने घेतली नाही. संचालक मंडळातील अनेकांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून कारभार हाकण्याचा प्रयत्न केला गेला.
हेही वाचा - बीड : काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस.. अनेक 'शिलेदार' पक्षाचा हात सोडून भाजपमध्ये जाण्याची तयारी
यासंदर्भात गणपती सोनाप्पा कांबळे यांनी आपल्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या असल्याची तक्रार घेऊन केज पोलीस ठाण्यात चकराही मारल्या. परंतु, सत्ताधारी पक्षाच्या आमदार व त्यांच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची हिम्मत पोलिसांनी दाखवली नाही. अखेर त्यांनी केज न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. याप्रकरणी न्यायालयाने सर्व पडताळणी केल्यानंतर भाजप आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती डॉ. विजय प्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.