बीड - शहरातील पेठ बीड भागात गांधीनगर येथील एका भंगारच्या दुकानातून मोठ्याप्रमाणात गुटखा विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी बुधवारी रात्री साडेआठ वाजता पोलिसांनी छापा टाकला. मात्र, गुटखा न मिळता त्याठिकाणी गुटखा खरेदी-विक्री करण्यासाठीचे ४० कोटी रुपयांचे कुपन पोलिसांच्या हाती लागले आहेत. दरम्यान, अप्पर अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्करराव सावंत यांनी पेठ बीड ठाण्यात जाऊन चौकशी केली.
हेही वाचा... गुड न्यूज : 'मरकज'ची वारी करणारे साताऱ्यातील 38 लोक 'निगेटिव्ह'
पोलीस माहितीनुसार, शहरातील गांधीनगरमधील महेबूब खान याचे भंगार आणि टायरचे दुकान आहे. तेथे गुटख्याचा लाखाेंचा कुपन साठा करुन ठेवल्याची माहिती पेठ बीड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वास पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बुधवारी रात्री साडेआठ वाजता सहकाऱ्यांना सोबत घेऊन छापा टाकला. यावेळी तेथे लाखो रुपयांच्या कुपनचे गठ्ठे आढळले. ते ताब्यात घेऊन ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान, कुपन मिळाले मात्र गुटखा मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल काय करायचा ? असा पेच निर्माण झाला होता. मात्र, कायदेशीर सल्ला घेऊन गुरुवारी रात्री आठ वाजता गुन्हा नोंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या फिर्यादीवरुन विषद्रव्याची विक्री व त्यास प्रोत्साहन देण्याचे कृत्य केल्याचा गुन्हा नोंदवण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कुपनची मोजदाद करताना पोलीस कर्मचारी घामाघूम झाले होते. एकूण ४० कोटी रुपये किंमतीचे हे कुपन पोलिसांच्या हाती लागले असून, त्यानुसार तेवढ्याच किंमतीच्या गुटख्याची तस्करी झाली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. अप्पर अधीक्षक विजय कबाडे म्हणाले की, सुमारे ४० कोटींचे कुपन हस्तगत करण्यात आले आहेत. गुटख्याची तस्करी करण्यासाठी या कुपनचा चलन म्हणून वापर केला जात असावा. कुपनप्रमाणे तितक्याच किंमतीचा गुटखा बीड जिल्ह्यात विक्री केला असावा, असा अंदाज आहे. तपासात आणखी काही बाबी स्पष्ट होतील.
अशी आहे कुपन प्रणाली ?
पोलीसांच्या माहितीनुसार, अधिकाधिक गुटखा विकला जावा यासाठी विक्रेत्याला सवलत कुपन दिले जातात. गुटखा विक्रीच्या प्रमाणात सवलत कुपनची किंमत ठरलेली असते. पुढील खरेदीवेळी या कुपनआधारे उर्वरित रक्कम कापून घेतली जाते. हे कुपन म्हणजे गुटख्याच्या व्यवसायातील चलनच असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारच्या कुपन प्रणालीचा भंडाफोड करणारी पेठ बीड पोलिसांची ही पहिलीच मोठी कारवाई आहे.