बीड - लोकसभा निवडणुकीचा निकाल आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. मतदानापासून कोण निवडून येणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. मतमोजणी काही तासांवर येऊन ठेपली, तशी कार्यकर्त्यांमध्ये धडधड वाढत आहे. बीड लोकसभेत कोण बाजी मारणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात काटे की टक्कर झाली आहे. आता बीडचा खासदार कोण? याबाबत कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
बीड लोकसभा मतदार संघात भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या बहीण भावांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मंत्री मुंडे यांनी आपली बहीण डॉ . प्रीतम मुंडे यांच्या विजयासाठी जंग जंग पछाडले आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघे विजयाबाबत तेवढ्याच आत्मविश्वासाने सांगतात. मात्र, 23 तारखेला निकालानंतरच कोण बाजी मारेल? हे स्पष्ट होईल. बीड लोकसभा निवडणुकीच्या निकालावरच बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ठरणार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवर अनेकांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
14 टेबलवरून एकाच वेळी होणार मतमोजणी
एकूण सहा खोल्या व 14 टेबलवरून लोकसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. यासाठी अडीच हजारांहून अधिक कर्मचारी मतमोजणीच्या कामासाठी सज्ज आहेत. बीड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी सांगितले आहे.
मागील महिनाभर कोण निवडून येणार, याबाबत मोठी चर्चा होत होती. प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे या लढतीमध्ये सुरुवातीला मॅनेज उमेदवार म्हणून बजरंग सोनवणे यांना भाजपने संबोधले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी पुत्र या टॅगलाईनखाली प्रचार केला. शेवटी भाजपसाठी बीडची लढत आव्हानात्मक ठरली.