बीड - जिल्ह्याच्या पालकमंत्री व राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची परळी येथे मराठा बांधवांच्या वतीने घोड्यावर बसून मिरवणूक काढण्यात आली. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण दिले. यामध्ये पंकजा मुंडे व एकंदरीतच भाजपची सकारात्मक भूमिका होती.

मिरवणूकीच्या वेळी परळी शहरात ठिकठिकाणी पंकजा मुंडे यांचे मराठा बांधवांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अनेक महिलांनी पंकजा मुंडे यांचे औक्षण केले. मिरवणूकीनंतर पंकजा मुंडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार समारंभात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की "मी कधीही कोणाला खोटं बोलून राजकारण केलेले नाही. मी जे बोलते तेच करते, कारण मी या जिल्ह्याची माता आहे. जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले हे माझे आदर्श आहेत. येणाऱ्या काळात देखील मी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. मराठा समाजाला जेव्हा-जेव्हा माझी गरज असेल तेव्हा मी मदतीला तयार आहे." बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
