बीड - भाजप सरकारच्या काळात खूप चांगली कामे झालेली आहेत. भाजप सरकारने जे लोकहिताचे निर्णय घेतलेले आहेत, ते महाविकास आघाडी सरकारने बदलू नये, असे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.
थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय हा खूप लोकप्रिय निर्णय आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातून आणि बारामतीतील ग्रामपंचायतींमधूनही याला पाठिंबा मिळाला होता, त्यामुळे हा निर्णय बदलने चुकीचे आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
बीड जिल्हा पुन्हा एकदा गुंडगिरीकडे वाटचाल करत आहे, असा टोला पंकजा मुंडे यांनी नामोल्लेख न करता पालकमंत्री धनंजय मुंडे यांना लगावला. बीडची जनता परळीत होत असलेल्या घडामोडी बारकाईने पाहत आहे. चुकीचे काम करणाऱ्यांना जनता कधीच माफ करत नसते, असे सांगत पंकजा मुंडे यांनी नामोल्लेख न करता पालकमंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला.
हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; पंतप्रधान मोदी व सोनिया गांधींची घेणार भेट
दोन दिवसांपूर्वी परळी शहरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. यामुळे महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येलाच परळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावरून पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
भाजपच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त पंकजा मुंडे शुक्रवारी बीडमध्ये आल्या होत्या. यावेळी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.