बीड - बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठीशी बीडच्या जनतेने भक्कमपणे उभे राहावे, असे अवाहन बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. बीड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या क्षीरसागर यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
मुंडे पुढे म्हणाल्या की, येणाऱ्या काळात बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आम्ही सर्व युती म्हणून एका दिशेने जाणार आहोत. राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. आमच्या पंखाला बळ देताना विजयाची जोड लावा, असे आवाहनही मुंडे यांनी केले. यावेळी आमदार सुरेश धस, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे उपस्थित होते.
बिघडलेले पुतणे पवारांनी घरात घेतले - आ.सुरेश धस
क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ रायमोहा येथे आयोजित सभेमध्ये बोलताना आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी आणि पवारांवर हल्लाबोल केला. ते आपल्या भाषणामध्ये म्हणाले, जयदत्त आण्णा क्षीरसागरांनी राष्ट्रवादीमध्ये मोठा वाईट काळ सोसला याचा मी साक्षीदीर आहे. आमच्या घरात काही चाललेले नाही, हे सांगण्याची वेळ पवारांवर येत आहे. सगळे बिघडलेले पुतणे पवारांनी आपल्या घरात घेतले आणि तिच सवय त्यांच्या घराला लागली. आम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना सांगत होतो क्षीरसागरांच्या घरामध्ये वाद होतील असे चुकीचे वागू नका. घर फुटले मात्र त्यांनी ऐकले नाही. त्यांना क्षीरसागरांचे घर फोडायचेच होते. मी जेव्हा अडचणीत होतो तेव्हा क्षीरसागर बंधू माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले. प्रीतम मुंडे जेव्हा अडचणीत होत्या तेव्हा त्यांच्या पाठीशी जयदत्त क्षीरसागर खंबीरपणे उभे राहिले. आज आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
हेही वाचा - माजलगाव मध्ये पतीच्या विजयासाठी पत्नी 'डोअर टू डोअर'
विरोधक रडतील पडतील त्यांना थरा देऊ नका - जयदत्त क्षीरसागर
यावेळी, क्षीरसागर यांनीही विरोधकांवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून मी राजकारण आहे, मात्र कधीही दुजाभावाचे राजकारण केले नाही. विरोधकांची ही बेगडी रूपे ती तात्पुरती आहेत. ते रडतील पडतील पण त्यांच्या या रूपाला थारा देऊ नका, अशी साद घालत जयदत्त क्षीरसागर यांनी विरोधकांवर निशाणा साधला.