बीड - परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने अर्ज केल्यावरच नुकसानीचे पंचनामे होणार आहेत. जो शेतकरी अर्ज करणार नाही, त्याच्या पिकांचे पंचनामे जिल्हा प्रशासन करणार नसल्याचा नवा तुघलकी नियम सरकराने लावला आहे.
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर विमा कंपनीचा कर्मचारी शेतकऱ्यांच्या शेतात येऊन पंचनामा करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. जे शेतकरी ऑनलाइन अर्ज दाखल करू शकणार नाहीत त्यांना मात्र नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागणार आहे. प्रशासन पिक विमा कंपनीच्या सोयीनुसार काम करत आहे, असा आरोप बीड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान केले आहे. यामध्ये रब्बीची पेरलेली ज्वारीशिवाय सोयाबीन तूर व कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. सरसकट पंचनामे करून शतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे अपेक्षित आहे. मात्र, सरकार व प्रशासन पुन्हा शेतकर्यांना रांगेत उभे करण्याची व्यवस्था राबवत आहे. याचाच एक भाग म्हणजे, ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. त्या शेतकऱ्यांनी लेखी अर्ज, ई-मेल, किंवा टोल फ्री क्रमांकावर फोन करून नुकसानीची माहिती दिल्यावरच विमा कंपनीच्या वतीने आम्ही नुकसानीचे पंचनामे करू. त्यानंतर परिस्थिती पाहून व निकषानुसार आम्ही भरपाई देऊ, असे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
नाव न छापण्याच्या अटीवर विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की ज्या शेतकऱ्यांच्या शेतात नदीचे अथवा ओढ्याचे पाणी घुसून नुकसान झाले आहे, त्याच शेतकऱ्यांना विमा कंपनी नुकसान भरपाई देणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचून नुकसान झालेले आहे त्यांना मात्र विमा कंपनी नुकसान भरपाई देणार नाही. दरम्यान, विमा कंपनी वगळता कृषी विभागा अंतर्गत पंचनामे करून जिल्हा प्रशासन नुकसान भरपाई देणार का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
हेही वाचा- पंकजा मुंडे आता विधान परिषदेवर जाणार का? चर्चांना उधान