आष्टी ( बीड) - गेल्या पंधरा दिवसांपासून आष्टी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आष्टीसोबतच पाटोदा व शिरूर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने, या मतदार संघात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून द्यावा, तसेच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला मंजुरी द्यावी अशी मागीणी माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनी याबाबत पंडित जवाहर नेहरू विद्यालयाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी
पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज एक हजारांचा टप्पा पार करत आहे. अनेकांना वेळत बेड उलब्ध होत नाहीत, बेड उलब्ध झाल्यास ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याठिकाणी रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे, तसेच ऑक्सिजनचा देखील तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर जशी अंबाजोगाई येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे, तशीच मंजुरी आष्टी तालुक्यात द्यावी. अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे पालकमंत्री धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते यांना देखील निवेदन दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
...तर दोनशे बेडची व्यवस्था करू
दरम्यान सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढत असून, कोरोनाबाधितांना उपचार घेण्यासाठी बेड कमी पडत आहेत. परंतु जर उपचारासाठी बेड कमी पडत असतील तर आपण आनंद चॅरीटेबलच्या वतीने दोनशे बेडचे कोविड सेंटर उभारू, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा - मुंबई : मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा