बीड - राज्यातील रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये सरकारने होम आयसोलेशन रद्द केल्यानंतर बीडमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये शासनाच्या या निर्णया विरोधात संताप पहायला मिळात आहे. सरकारने आधी आरोग्य सेवा सुधारीत द्यावी, नंतरच होम आयसोलेशन रद्द करावे, असा पवित्रा बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी घेतला आहे. यापूर्वी शासनाच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचे वाईट अनुभव आहेत. एवढेच नाही तर अनेक कोविड सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, असे आरोपही नागरिकांनी केले आहे.
आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या 82 हजार 831 एवढी आहे. तर 75 हजार 217 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. रिकव्हरी रेट 90. 80 टक्के एवढा असून जिल्ह्याचा डेथ रेट 2. 28 टक्के आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात 1 हजार 895 कोरोनाबाधित रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
'सुविधा अद्ययावत करा'
शासनाने व बीड जिल्हा प्रशासनाने आपली आरोग्य यंत्रणा सक्षम करावी, नंतरच होम आयसोलेशन रद्द करावे. या सरकारला कोरोनाबाधित रुग्ण कोविड सेंटरमध्ये कोंडून मारायचे आहेत का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे. शिवाय जोपर्यंत बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम होत नाही. तोपर्यंत सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याची परवानगी द्यावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला आहे. शिवाय शहरातील कोविड सेंटरमधील सुविधेवर शासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा-पुण्यात उघडली ऑक्सिजन लायब्ररी! पोस्टकोविड रुग्णांसाठी ठरणार फायदेशीर