बीड - उदगीरहून औरंगाबादच्या दिशेने निघालेली ट्रॅव्हल्स धारुरच्या घाटात पलटी झाली. यामध्ये एक महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत ट्रॅव्हल्समधील 21 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी पहाटे 2 वाजण्याच्या दरम्यान घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव ज्योती असे आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की उदगीर येथून औरंगाबादला जाणारी हमसफर ट्रॅव्हल्स ( एमएच-20- डब्ल्यु-9906 ) च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स धारूरच्या घाटातच पलटी झाली. यामध्ये एकूण 36 प्रवासी होते. या अपघातात 21 प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या.
त्यामुळे गंभीर जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये ज्योती नावाची एका महिलेसह एका वृद्ध महिलेचा समावेश होता. उपचार सुरू असताना ज्योती हिचा मृत्यू झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने धोकादायक वळणावर हा अपघात झाला असल्याचे, नागरिकांनी सांगितले.