बीड - राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेची सांगता आणि महाआघाडीची संयुक्त सभा आज (शनिवारी) परळीत पार पडली. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य आणि केंद्रातील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
महाराष्ट्र आणि बीड जिल्हा दुष्काळात होरपळत असताना सरकारने शेतकरी, सामान्यांना वाऱ्यावर सोडले आहे. संकटग्रस्त जनतेच्या मागे उभे राहण्याची दानत या सरकारमध्ये नाही, अशी टीका शरद पवार यांनी यावेळी केली. तसेच देश आणि राज्यातील समाजामध्ये धार्मिक तेढ पसरवण्याचे कार्य हे सरकार करत असल्याचा आरोपही यावेळी पवारांनी केला.
निर्धार परिवर्तनाचा यात्रेच्या समारोप प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, माजी मंत्री छगन भुजबळ, नवाब मलीक, जोगेंद्र कवाडे, रजनी पाटील, अमरसिंह पंडीत, उषा दराडे, प्रकाश सोळंके, सिराज देशमुख, सुरेश नवले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी नंदकिशोर मुंदडा, संदिप क्षीरसागर, अक्षय मुंदडा, रविंद्र क्षीरसागर, जयसिंह सोळंके , महेबुब शेख, सतिष शिंदे , चित्रा वाघ ,सक्षणा सलगर, आदिंची यावेळी उपस्थिती होती.
सभेला संबोधित करताना शरद पवार यांनी ५० वर्षाच्या सार्वजनीक जीवनातील ही अभुतपूर्व सभा असल्याची सुरुवात करत सरकारकडून ज १००% फसवणूक झाल्याची भावना देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेमध्ये निर्माण झाली आहे. नोकरीसाठी तरुण खेटे घालत आहेत, संवैधानिक संस्थांवर हल्ले होत आहेत. या सरकारने दिलेला कोणता शब्द पाळला? मंत्रीमंडळाच्या शेवटच्या बैठकीची वेळ आली तरी बारामतीत धनगर समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या शब्दाचा निर्णय झाला नाही. मराठा आरक्षण न्यायालयात अडकले आहे. मुस्लिम समाजाचे आरक्षण न्यायालयाने मान्य करुनही सरकार देत नाही. धर्माच्या नावाने विद्वेष पसरवला जात आहे. यांच्या मनात दलित, आदिवासी, सामान्यांबद्दल आकस आहे. समाजासमाजात विष पसरवणारांना धडा शिकविण्याची गरज आहे. दुष्काळ आहे पण छावणी नाही, रोजगार हमीची कामे नाहीत, संकटग्रस्तांच्या पाठिशी उभे राहण्याची धमक सरकारमध्ये उरलेली नाही. पण आम्ही हे सरकार उलथवून टाकू असा विश्वास पवारांनी यावेळी व्यक्त केला.
हे सरकार भिकारी झाले आहे - अशोक चव्हाण
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप सेनेचे सरकार हादरले असल्याचे सांगितले. लोकांच्या मनात प्रक्षोभ आहे, त्यासाठीचा आवाज बुलंद करण्याचे काम महाआघाडी करत आहे. भाजपच्या विरोधात विखुरलेल ७०% मतदान एकत्र आणण्यासाठी शरद पवार प्रयत्न करत आहेत आणि यातुनच परिवर्तन होणार आहे. सत्ता परिवर्तन अटळ असल्याचे सांगितले. बहुमताच्या जोरावर हम करे सो कायदा ही परिस्थिती गंभीर आहे, जनतेच्या व्यथा ऐकायलाही सरकार तयार नाही. या सरकारने अद्यापही कर्ज माफी केली नसल्याचे सांगत हे सरकार भिकारी झाले असून या सरकारकडून जनतेला काहीच मिळणार नसल्याचेही ते म्हणाले. आम्ही अजुनही प्रकाश आंबेडकरांची वाट पाहत आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तुम्हाला या नकलाकारामुळे धडकी का भरली?
छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना दिलेल्या इशाऱ्या उत्तर देताना, तुम्हाला या नकलाकाराची धडकी का भरली आहे? आम्हाला तुरुंगाची भिती नाही, छगन भुजबळ हा डरणारा नाही, तुम्ही मला भ्रष्टाचारी म्हणता, पण तुमच्या लोकांनी तर मुडदे पाडलेत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.
विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी परळीतली सभा मुख्यमंत्र्यांच्या काळजात कळ आणतेय, असा टोला लगावत तुमच्या मस्तवाल सत्तेचा समारोप परळीतुनच होईल असे सांगितले. आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद , जिल्हा परिषद, जिल्हा बँक ताब्यात असताना जिल्हयाच्या जनतेच्या आयुष्यात काय फरक पडला ? ऊसतोड कामगारांची संख्या कमी झाली ? सिंचनाचे ७८ प्रकल्प आजही प्रलंबित आहेत, थर्मलचे सर्व संच बंद आहेत, ते कायमचे बंद होणार आहेत, मग इथल्या पालकमंत्री काय करत आहेत, असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला. गोपीनाथ मुंडेंच्या नावाचे महामंळही रद्द झालं, त्यांच स्मारकही झालं नाही, याचा राग आपल्याला येणार आहे की नाही, असा सवाल परळीकरांना करत तो राग येत्या निवडणुकीत दाखवून देण्याचे आवाहन केले.
तुमचे अध्यक्ष तर तडीपार आहेत
मुख्यमंत्री फडणवीस यांनी छगन भुजबळांना दिलेल्या इशाऱ्याचा समाचार घेत तुम्ही मुख्यमंत्री म्हणून आमच्या नेत्यांना धमक्या देत असाल तर राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही, आमच्यावर आरोप काय करता तुमचे अध्यक्ष तडीपार आहेत, याचा एकदा विचार करा असे धनंजय मुंडे म्हणाले.
जयंत पाटील यांनी काही लोक स्पाँनसर्ड सभा करताहेत असे म्हणत भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्रात बहुजनांच नाव घेऊन काही लोक गर्दी जमवतायत, ते धर्मनिरपेक्ष मतांच्या विभाजनाची खेळी खेळत आहेत, या सभा स्पाँनसर्ड आहेत, असे म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सामुदायिक विवाहातून विरोधकांवर टीका करायची वेळ आल्याचा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला. यांना राजकारण कोठे करावे, याचेही भान नसल्याचे सांगत परळीच्या भुमितून आपण परिवर्तनाची सुरुवात करत असल्याचे सांगितले.
गोपीनाथ मुंडेंच्या हत्येची चौकशी करु - पाटील
गोपीनाथ मुंडे हे बीडचे भुमिपुत्र होते, त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी आपला नेता गमावल्याचायेथील जनतेचा आक्रोश मी पाहिला होता, म्हणुनच त्यांची हत्या झाल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशाची मी मागणी केली, यातं माझं काय चुकलं ? गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडेंचे वडील असल्याने त्या या मागणीला पाठिंबा देतील असं वाटलं होतं, पण पंकजा मुंडे मलाच शोभतं का? अस विचारतात. त्यांना कदाचित मर्यादा असतील, सत्ता जास्त महत्वाची असेल, पण आमचं सरकार आलं तर गोपीनाथ मुंडेंच्या हत्येची चौकशी करेल, असेही जयंत पाटील म्हणाले.