बीड- महाराष्ट्रातील राजकारण किळसवाणे झाले आहे. या राजकारणाचा वीट आला आहे, असे म्हणत आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घ्यायला निघालेले जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी अचानक मंगळवारी दुपारी यू-टर्न घेतला. मी राष्ट्रवादीचा आमदार म्हणून यापुढच्या काळात काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीतच आमदार प्रकाश सोळंके यांची मनधरणी करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीला यश आले आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदासाठी समावेश असलेल्या यादीमध्ये बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांचे नाव न आल्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे सोळंके स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणापासून संन्यास घ्यायला निघाले होते. एवढेच नव्हे सोळंके यांनी अध्यक्षांचा वेळ देखील मागितला होता. मात्र, मंगळवारी अचानक त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय बदलला आणि यापुढच्या काळात राष्ट्रवादीचा आमदार म्हणून मी बीड जिल्ह्यात काम करत राहणार, असे स्पष्ट केले.
तळ्यात-मळ्यात भूमिकेमुळे कार्यकर्ते होते संभ्रमात
आमदार सोळंके यांच्या तळ्यात-मळ्यात भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात होते. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार प्रकाश सोळंके यांचे नाव न आल्याने ते चिडले होते. महाराष्ट्रातील राजकारण किळसवाणे झाले आहे. पक्षात अनेक वर्ष काम केल्यानंतर देखील पक्षाकडून हेटाळणी होत असल्याचे जाहीरपणे सोळंके यांनी वक्तव्य केले होते. असे वक्तव्य करून काही तास होतात न होतात तोच आमदार प्रकाश सोळंके यांनी यू टर्न घेत राष्ट्रवादीचा आमदार म्हणून काम करणार असे सांगितले. स्वतः शरद पवार यांनी मध्यस्थी केली असल्याचेही मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कोणत्या मुद्द्यावर सोळंके यांचा राजीनामा देण्याचा विचार बदलला. याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. येणाऱ्या काळात आमदार सोळंके यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षपद देणार का? असा प्रश्नही राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत अपशब्द, महिला शिवसैनिकांनी अधिकाऱ्यावर ओतली शाई