अंबाजोगाई (बीड) - लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनामुळे अत्यवस्थ झालेल्या २२ रुग्णांना पुढील अत्यावश्यक उपचारांसाठी स्वाराती रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात दाखल करणे गरजेचे होते. मात्र, यापूर्वीच वारंवार सूचना करूनही स्वाराती रूग्णालयाच्या सुस्त प्रशासनाने वाढीव कोरोना आयसीयू बेडची तयारी ठेवली नसल्याने तिथेही बेड शिल्लक नव्हते. त्यातच अधिष्ठातांनी कॉल न स्वीकारून संपर्कात राहणे टाळल्याने संतप्त झालेले ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी बुधवारी (दि. १४) स्वाराती रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करत अधिष्ठातांना धारेवर धरले.
कोरोनाचा उद्रेक झाल्याने स्वाराती रुग्णालयावर मोठा ताण आला आहे. यात डॉक्टरांची कमतरता, रिक्त असलेल्या पदसंख्या या सर्व गोष्टींमुळे स्वाराती प्रशासन हतबल झाले आहे लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना देखील स्वाराती रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात येत आहे. मंगळवारपासून येथे अत्यवस्थ झालेले २२ रुग्ण नंदकिशोर यांच्या माध्यमातून स्वरातीच्या आयसीयूमध्ये बेड मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, तिथे जागा शिल्लक नसल्याने रुग्ण हवालदिल होत असल्याचे पाहून मुंदडा यांनी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याकडे बेड उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. बुधवारी सकाळी सुक्रे यांनी मुंदडा यांचे कॉल घेण्याचे टाळले तर अक्षय मुंदडा यांच्या कॉलनंतरही भेटण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे संतप्त झालेले नंदकिशोर आणि अक्षय मुंदडा यांनी समर्थकांसह स्वाराती रुग्णालयासमोर तीन तास ठिय्या दिला. यावेळी मुंदडांनी बेड, ऑक्सिजन यावरून अधिष्ठाता सुक्रे यांना धारेवर धरले. प्रशासनाकडून उपाययोजनांचे ठोस आश्वासन मिळत नसल्याने आंदोलन चिघळेल या भीतीपोटी पोलीस दल पाचारण करण्यात आले होते. मात्र, मुंदडा यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन अधिष्ठातांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात मुंदडा यांच्यासह सभापती मधुकर काचगुंडे, नेताजी शिंदे, महादेव सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, एड. संतोष लोमटे, खलील मौलाना, शेख ताहेर, बाला पाथरकर, बळीराम चोपणे, अनंत अरसुडे, नूर पटेल यांच्यसह शेकडो समर्थकांनी सहभाग घेतला.
सूचना करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष -
संभाव्य बिकट परिस्थिती लक्षात घेऊन आपण वेळोवेळी स्वाराती प्रशासनासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला उपाययोजना राबवण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर रुग्णांची हेळसांड झाली नसती. औषधासह ऑक्सिजन दोन दिवस पुरेल एवढा साठा असेल तर आजपासूनच त्याच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे नमिता मुंदडा म्हणाल्या.
ऑक्सिजन आणि बेडची कमतरता भासू देणार नाही. स्वाराती रुग्णालयात रुग्णसंख्या वाढत असून त्यांना आरोग्यविषयक सुविधा मिळवून देण्यासाठी स्वाराती प्रशासन संपूर्ण प्रयत्न करत आहे. रुग्णालयात सध्याच्या दोनशे व्यतिरिक्त आणखी ९० खाटा आणखी तयार करण्यात येत असून त्यात ६६ खाटांना ऑक्सिजन व आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. नव्याने उपलब्ध करण्यात येत असलेल्या ९० खाटा तयार झाल्यास कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे. गरज पडली तर मेडिसिन विभागाची २३० खाटांची इमारत कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या वार्डात सध्या ऑक्सिजन सुविधा बसविणे सुरु असून काही दिवसातच संपूर्ण इमारत कोरना रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. कोणताही रुग्ण आरोग्य सुविधेपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे म्हणाले.