बीड - परळीमध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची हत्या झाल्याची घटना सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास समोर आली. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पांडू गायकवाड असे हत्या झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. त्यांच्या खूनाचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास परळी पोलीस करत आहेत.
परळीच्या ओव्हर ब्रिजच्या पुलाखाली गायकवाड यांची अज्ञाताकडून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोरांनी त्यांच्या चेहऱ्यावर तलवारीने वार करून त्यांची हत्या केली आहे.परळी शहरात पाणीटंचाई असल्याने फुलेनगर प्रभागात टँकरने पाणी वाटपाचे काम सुरू होते. त्यामुळे परिसरात फार गर्दी नव्हती. तेव्हा अज्ञात हल्लेखोरांनी पांडूरंग यांच्यावर हल्ला करत पळ काढला. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या हल्ल्यामध्ये पांडूरंग यांच्या शरिरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पांडूरंग गायकवाड हे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे विश्वासू होते, तर त्यांच्या पत्नी फुलेनगर प्रभागाच्या नगरसेविका आहेत. पांडूरंग हे या अगोदर परळी नगरपरिषदेत नगरसेवक होते. त्यांच्या हत्येमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पांडूरंग यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून, तो शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शहरातील संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पांडूरंग यांच्या हत्येने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ८ दिवसांपूर्वी परळी शहरात अशाच प्रकारे एका व्यापाऱयावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.