बीड - आरक्षण गोरगरीब व मागासलेल्यांसाठी महत्त्वाचे आहे. आरक्षणाच्या बाबतीत आम्हाला नाही, तर कोणालाच नाही. अशी भूमिका अत्यंत चुकीची आहे, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी बीड येथे व्यक्त करत छत्रपती उदयनराजे भोसले यांना नाव न घेता टोला लगावला आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी पत्रकार परिषदेत बोलताना छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत बोलणार आहे.
यावेळी मराठा आरक्षण संदर्भात बोलताना, मला नाही तर कोणालाच नाही, ही भावना चुकीची आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांनी सतत इतरांचा विचार केलेला आहे. त्यामुळे, आम्ही केवळ आमच्यासाठी मागू शकत नाही. ती संस्कृती आमची नाही. असे सांगत संभाजी राजे यांनी उदयनराजे भोसले यांच्या त्या वक्तव्याबाबत नाव न घेता टोला मारला आहे.
बांधावर जाऊन पंचनामे करा-
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला असताना शेतकऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत आमच्याकडे प्रशासनातला एकही अधिकारी फिरलेला नाही. याचा अर्थ अधिकारी बांधावर जात नाहीत. ते चुकीचे आहे. असे असेल तर शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहतील. त्यामुळे, प्रशासनाने गांभीर्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, असे संभाजी राजे म्हणाले.
हेही वाचा-पीक नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे निर्देश - मंत्री अमित देशमुख