बीड - मी मुंबईमध्ये रेड झोनमध्ये राहात होते. सुरुवातीला बीड जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. आपण रेड झोनमधून कशाला यायचं म्हणून मी बीडला आले नाही, असे स्पष्टीकरण बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी मंगळवारी बीडमध्ये आल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिले.
बीडच्या खासदार कोरोनाच्या बिकट परस्थितीत बीड जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून मुंबईत बसल्या आहेत, अशी टीका विरोधकांकडून खासदार मुंडे यांच्यावर गत आठवड्यात झाली होती. बीड जिल्ह्यात सर्वच पक्ष संघटना व सेवाभावी संस्थांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाला कोरोनाच्या बिकट परिस्थितीत मदत केली आहे. या सगळ्या परिस्थितीत मात्र बीडच्या खासदार प्रीतम मुंडे जिल्ह्यात उपस्थित नव्हत्या यावरुन त्यांच्यावर व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका झाली होती.
. . अखेर खासदार मुंडे मंगळवारी बीड जिल्ह्यात झाल्या दाखल
खासदार मुंडे मंगळवारी बीड जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, जरी मी बीड जिल्ह्यात उपस्थित नसले, तरी सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात होते. कुठल्या उपाययोजना करता येतील व काय केले पाहिजे, या संदर्भात सातत्याने अधिकाऱ्यांशी बोलत होते. मी एक डॉक्टर असून माझे कर्तव्य आहे की, मी जर रेड झोनमध्ये राहत असेल व बीड जिल्हा ग्रीन झोनमध्ये असेल तर जाऊ नये, असे मला वाटले. म्हणून मी आले नाही. मी जरी इथे प्रत्यक्षात उपस्थित नव्हते, तरी आमच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जिल्हा प्रशासनाला व संकटात अडकलेल्या नागरिकांना मदत केलेली आहे, असे यावेळी म्हणाल्या.