बीड - सध्या वाळू माफियांवर कारवाई करण्याचा तडाखा राज्यभरातील पोलिसांना लावला आहे. आता केज तालुक्यातील पोलिसांनीही वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. केज तालुक्यातून उस्मानाबाद जिल्ह्याकडे जाणारे वाळूचे दोन ट्रक वाहतूक शाखेने ताब्यात घेतले आहेत. त्यावर गौण खनिजाच्या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी तहसील कार्यालयाला कळविले आहे.
वाळू वाहतुकीचा परवाना, पण...
१७ मार्च रोजी दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास केज येथील धारूर रोडवरील जय भवानी चौकातून वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकमधून (एमएच-४५/टी-६७६४, एमएच -१२/एफझेड-७५३६) वाळू नेली जात होती. ते ट्रक उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबकडे जात असल्याची गुप्त माहिती केज वाहतूक पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाहतूक शाखेचे हनुमंत चादर यांनी सापळा रचून हे दोन्ही ट्रक अडवून पोलिस स्टेशनला आणले. संबंधित वाळू वाहतूक करणाऱ्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना होता. परंतु, पोलिसांना त्यात परवानगीपेक्षा जास्त वाळू असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी केज तहसीलदारांना पत्र देऊन गौण खनिज संदर्भात या ट्कमधील वाळू साठ्याचे मोजमाप केले. शिवाय, त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी तहसीलच्या गौण खनिज विभागाला कळविले आहे. त्यानुसार, तब्बल चोवीस तासानंतर केज तहसीलचे मंडळाधिकारी भागवत पवार यांनी संबंधीत गाड्यांचा पंचनामा करून त्यातील वाळू साठ्याचे पंचासमक्ष मोजमाप केले. तसेच, त्याचा अहवालही वरिष्ठांना दिला आहे. आता पुढे याप्रकरणी वाळू वाहतुकीचा परवाना असणाऱ्यांवर काय कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा- उरी, पठाणकोट,व पुलवामा हल्ल्याचा काय तपास केला? सामनातून एनआयएला विचारणा