बीड - राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच अंगावर शहारे आणणारी एक घटना समोर आली आहे. चक्क सोळा वर्षाच्या (अल्पवयीन) मुलीवर सहा महिन्यात सहाशेहून अधिक व्यक्तींनी अत्याचार केले असल्याची घटना समोर आली आहे. बाल कल्याण समिती अध्यक्ष तथा प्रथम वर्ग दंडाधिकारी डॉ. अभय वनवे यांनी चिंता व्यक्त करत 'इटीव्ही भारत' शी बोलताना संगितले, की संबंधित अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीचे अनेकांनी अत्यंत क्रूरतेने शोषण केलेले आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यात चारशेहून अधिक व्यक्तींनी अत्याचार केलेला आहे. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचादेखील समावेश असून संबंधित अल्पवयीन मुलगी वीस आठवड्याची गर्भवती आहे. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. याची चौकशी करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या असल्याचे डॉ. वनवे म्हणाले.
हेही वाचा - महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी समाज आणि सरकार एकत्र येण्याची गरज : नीलम गोऱ्हे
भीक मागून उदरनिर्वाह
याबाबत सविस्तर महिती अशी आहे, की बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांच्याकडे दोन दिवसापूर्वी एक तक्रार आली. या तक्रारीवरून केलेल्या तपासात गंभीर बाब समोर आली आहे. या संदर्भात माहिती देताना बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वनवे म्हणाले, की जिल्ह्यातील एका गावात एका सोळा वर्षाच्या मुलीची कहाणी अक्षरश: अंगावर शहारे आणणारी आहे. लहान असतानाच आईचे छत्र हारवले. सात-आठ महिन्यापूर्वी वडिलांनी अल्पवयातच लग्न लावून दिले. सासरी नवरा संभाळत नसल्याने ती अल्पवयीन मुलगी वडिलांकडे राहायला आली. परंतू वडिलांनीदेखील तिला सांभाळण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत त्या मुलीला अंबाजोगाई येथील बस स्थानकावर भीक मागून स्वत:चा उदरनिर्वाह करावा लागला. याचदरम्यान तिला अत्यंत वाईट घटनांना सामोरे जावे लागले असल्याचे संबंधित अल्पवयीन मुलीने बालकल्याण अधिकारी यांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.
उर्वरित आरोपींचे काय?
याबाबत अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदरील अल्पवयीन मुलीने सांगितल्याप्रमाणे दोघा जणांना ताब्यातदेखील घेतले आहे. मात्र संबंधित मुलीच्या जबाबातील उर्वरित आरोपींचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा - 'तुला पप्पांनी बोलावले' म्हणून अल्पवयीन मुलीला बळजबरीने नेले लॉजवर; नराधमाने केले 'असे' दुष्कृत्य
काय म्हटले आहे जबाबात?
अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीने बालकल्याण समितीच्या प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्याकडे दिलेल्या जबाबात म्हटले आहे, की माझ्यावर अनेकांनी अत्याचार केला. याबाबत मी तक्रार घेवून अंबाजोगाई येथील पोलीस ठाण्यात अनेकवेळा गेले, मात्र संबंधित पोलिसांनी मला अनेकदा तेथून हुसकावून लावले. माझे म्हणणे ऐकूनसुद्धा दोषींवर कारवाई केली नाही. एवढेच नाही तर एका पोलीस कर्मचाऱ्यानेदेखील माझ्यावर अत्याचार केला. या प्रकरणात संबंधित आरोपींवर उशिरा का होईना अंबाजोगाई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
'पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा'
राज्यात व बीड जिल्ह्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. कायद्याचा धाक कमी झाला आहे, अशी खंत तत्वशील कांबळे यांनी व्यक्त केली.