बीड : बीड जिल्ह्यात सध्या 9 कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली कडा कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध काढण्यात आली आहे. मागील 20 वर्षापासून कडा कृषी उत्पन्न बाजार समितीवरील आमदार सुरेश धस यांचे वर्चस्व याही पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दिसून आले. आमदार सुरेश धस यांच्या गटाचे 12 संचालक, माजी आमदार भीमराव धोंडे यांचे समर्थक 3 संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे आणि माजी आमदार साहेबराव दरेकर यांचे 3 संचालक अविरोध निवडून आले. कडा कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
'या' उमेदवारांच्या बिनविरोध निवडी : नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये भाजपा आमदार सुरेश धस गटाचे रमजानशेठ तांबोळी, संजय बलभीम ढोबळे, अशोक मोहन पवार, रामशेठ बाळनाथ मधुरकर, वंदना परिवंत गायकवाड, बुवासाहेब सुभाष शेकडे, राजू मुरलीधर हुलगे, संजय कांतीलाल मेहेर, जयश्री तळेकर, शेंडगे रामदास भगवान, मुरलीधर फसले, छाया अशोक लगड, माजी आमदार भीमराव धोंडे गटाचे नामदेव आनंदराव धोंडे, अण्णासाहेब लांबडे, बेबीनंदा भगवान नागरगोजे, आमदार बाळासाहेब आजबे व माजी आमदार साहेबराव दरेकर गटाचे पंडित पोकळे, मधुकर सायंबर, राजेंद्र गव्हाणे यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेले उपक्रम : आमदार सुरेश धस यांचे 12 समर्थक, आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांचे 03 समर्थक असे 15 संचालक भारतीय जनता पार्टीचे आहे. विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 03 समर्थक या संचालक निवडणुकीमध्ये आहेत. कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेले अनेक उपक्रम राबवले आहेत. ही शेतकऱ्यांची संस्था म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या ठिकाणी मतभेद न करता आम्ही निवडणूक बिनविरोध पार पाडावी, यासाठी प्रयत्न केले आहेत, असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले आहे.