बीड - सध्या कर्जाबाबत शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यापूर्वीच बँकांना योग्य त्या सूचना प्रशासनाच्या मार्फत देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज वाटप करण्याबाबत आमचा पाठपुरावा सुरू आहे. राहिला प्रश्न पीकविम्याचा, तो देखील पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मार्गी निघालेला आहे. या बाबतीत सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा व योग्य निर्णय लवकर घेईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार संजय दौंड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.
शेतकऱ्यांना कोरोनाच्या बिकट परिस्थितीत आमचे आघाडी सरकार शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करत असल्याचे आमदार दौंड म्हणाले. बीड जिल्ह्यासह राज्यातील दहा ते अकरा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या पीकविमा प्रश्न पालकमंत्री व मी आमचे नेते व मार्गदर्शक शरद पवार यांच्यासमोर मांडलेला आहे. याबाबत शासन पातळीवर काही बैठका देखील झालेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात पीक विम्याच्या संदर्भाने शेतकर्यांचा हिताचा निर्णय आघाडी सरकार घेईल. याबाबत आमचा सतत पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही काळजी करण्याचे कारण नाही, असे सांगत आमदार दौंड यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधार दिला आहे.
सध्या कोरोनाची बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत पीक कर्जासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.