बीड - परळी तालुक्यातील टोकवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी धडाकेबाज भाषण केले, तसेच राजकीय कोट्या करत राजाची गोष्टही सांगितली. त्यानंतर भाषण संपताच आमदार संजय दौंड यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कडकडून मिठी मारली.
हेही वाचा - आपेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना बनला हायटेक!
परळीत आयोजित एका कार्यक्रमास पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संजय दौंड, आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार विजय गव्हाणे, जेष्ठ नेते बाबुराव मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संयोजक अँड. विष्णुपंत सोळंके यांनी मान्यवरांचा नामोल्लेख करताना 'एका वर एक फ्री आमदार म्हणून लॉटरी लागलेले आमदार संजय दौंड' असा उल्लेख केला. या वाक्याने उपस्थितांत हशा पिकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंकेंनी मराठवाडा दुष्काळ व पाण्याचा प्रश्न यावर मनोगत व्यक्त केले.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी, कार्यक्रमाला उशीर का झाला? हे सांगतानाच एका राजाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, एका राजाच्या हातून त्याच्याच तलवारीने चुकून त्याचे बोट तुटले. तिथे उभे असलेल्या प्रधानाने या घटनेवर भाष्य करताना 'जे होते ते चांगल्यासाठीच होते..!' असे भाष्य केले. या प्रतिक्रियेवर संतप्त झालेल्या राजाने, माझा अंगठा तुटला आणि तू चांगल्यासाठी होते असे म्हणतो..! म्हणून प्रधानाला काळ्याकोठडीत डांबण्याची शिक्षा दिली. पुढे राजा एकदा जंगलात भटकत असताना आदी मानवांच्या कचाट्यात सापडला. आदी मानवांनी त्याला त्यांच्या राजापुढे नरबळीसाठी उभे केले, परंतु या राजाचा तुटलेला अंगठा पाहून हा भंगलेला देह नरबळीसाठी चालत नसल्याचे सांगून राजाला सोडून दिले.
जीव वाचल्यामुळे खूष झालेला राजा आपल्या राजवाड्याला परतला. अंगठा तुटल्यानंतर, जे होते ते चांगल्यासाठीच होते, असे म्हणणाऱ्या प्रधानाला त्या राजाने आनंदात सोडून दिले. सोडल्यावर प्रधानाने पुन्हा 'जे होते ते चांगल्यासाठीच होते..!' अशी प्रतिक्रिया दिली. त्या वाक्यावर राजाने पुन्हा प्रधानाला खुलासा विचारला. तेव्हा राजाला प्रधान सांगू लागला, राजासाहेब नरबळीच्या वेळी मी सावलीसारखा प्रधान म्हणून तुमच्याबरोबर असलो असतो, तर तुम्हाला सोडून तिथे माझाच नरबळी गेला असता. म्हणून म्हणतोय 'जे होते ते चांगल्यासाठीच होते' हे वाक्य आणि गोष्ट आपल्या खास शैलीत धनंजय मुंडे यांनी सांगितली.
मुंडे यांच्या कथेनंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. उपस्थित पोट धरून हसत असतानाच व्यासपीठावर बसलेले आमदार संजय दौंड उठले आणि धनंजय मुंडे यांच्या जवळ जाऊन त्यांना कडकडून मिठी मारली. 'जे होते ते चांगल्यासाठीच होते' हे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे वाक्य फ्री आमदार आणि घडलेल्या घडामोडीला उत्तर देऊन गेले.
हेही वाचा - बीड - अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची आमदार नमिता मुंदडांकडून पाहणी