बीड- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ माजली आहे. त्या कार्यक्रमातून लातुरात आलेल्या ८ जणांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बीड जिल्ह्यातील चेक पोस्ट वरील 28 पोलीस कर्मचारी त्या 8 जणांच्या संपर्कात आल्याच्या संशयावरुन त्यांची चाचणी केली होती. मात्र, ते निगेटिव्ह आहेत.
हेही वाचा- १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम ठेवा; तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांची मागणी..
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, दिल्ली येथील निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ धार्मिक कार्यक्रमातून लातूर येथे आलेल्या 8 जणांना कोरोनाची लागण झाली. त्या आठ जणांनी बीड येथून प्रवास केला होता. बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पोलीस चौकी वरील पोलिसांच्या संपर्कात ते आले होते. त्यामुळे हे कर्मचारी कोरोना बाधित आहेत की, काय? असा प्रश्न निर्माण झाला होता.
यावरुन त्या 28 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट सोमवारी रात्री आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला. रिपोर्टनुसार ते 28 पोलीस कर्मचारी निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बीडकरांनी सुटकेचा निश्वास सोडला असून आज घडीला जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही. ही बीड जिल्ह्यासाठी समाधानाची बाब असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितले.