बीड- भारतीय नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी आज (शुक्रवारी) शहर बंद ठेवत मोर्चा काढण्यात आला. मात्र, मोर्चादरम्यान अचानक गोंधळ सुरू झाला. या गोंधळाचे रुपांतर दगडफेकीत झाले. यामध्ये संतप्त मोर्चेकऱ्यांनी दगडफेक करत अनेक वाहनांची तोडफोड केली. ही घटना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात घडली. आज बीड बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, त्याला हिंसक वळण मिळाले. यामध्ये पोलिसांच्या गाडीचे देखील नुकसान झाले आहे.
हेही वाचा- 'जनभावनेचा आदर करून तरी सुधारित नागरिकत्व कायदा वेळीच मागे घ्या'
भारतीय नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी आज मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा सुरुवातीला शांततेत सुरू होता. मात्र, काही वेळात गोंधळ सुरू झाला. यातील काही माथेफिरूंनी दगडफेक सुरू केली. यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. यादरम्यान दगड फेकीमध्ये दोन बस व एक पोलीस व्हॅनचे नुकसान झाले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शहरातील विविध भागात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दगडफेक करणारे कोण? याचा तपास पोलीस करत असून दंगलखोरांवर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.