बीड - महिना-महिना बँकेकडे चकरा मारून देखील पीक कर्ज मिळत नाही. त्यामुळे आता बँकेकडे कर्ज मागायला जायचे देखील नको वाटते, अशा निराशाजनक भावना बीड जिल्ह्यातील शेतकरी बोलून दाखवत आहेत. बीड जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकऱ्यांना बँका कर्ज देत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर्षी पाऊस वेळेत पडला आहे. शेतकऱ्यांनी त्यामुळे पेरणी देखील केली. पिक चांगले येत आहे. मात्र, बँका पीक कर्जासाठी ताणून धरत आहेत, अशा प्रतिक्रिया बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये 10 लाखाहून अधिक बँकेचे शेतकरी खातेदार आहेत. यामध्ये सर्वच राष्ट्रीयीकृत बॅंकांचा समावेश आहे. दरवर्षी शासनाने दिलेल्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देखील काही बँका पूर्ण करत नाही. यंदा देखील अशीच बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका फार उत्साही नसल्याचे दिसत आहे.
हेही वाचा - एक नारद, शिवसेना गारद; देवेंद्र फडणवीसांचा 'बाण'
केवळ बैठकांचा फार्स...
शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाच्या संदर्भाने जिल्हा प्रशासन केवळ बैठकांचा फार्स करत आहे. प्रत्यक्षात मात्र नव्या-जुन्या खातेदार शेतकऱ्यांचा फंडा राबवून बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी डावलत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.
लोकप्रतिनिधी मात्र गप्प...
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी बँकांकडे महिनाभरापासून हेलपाटे मारावे लागत आहेत. अगोदर कागदपत्रांमध्ये बेजार झालेले शेतकरी आता पीक कर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्ज मंजूर झालेले नाही. अथवा पीक कर्जाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळालेले नाहीत. कोरोनाच्या बिकट परिस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात असताना देखील लोकप्रतिनिधी गप्प आहेत. यामुळे शेतकऱ्यांची अधिकच हेळसांड होत असल्याचे शेतकरी दिलीप चांदणे म्हणाले.
वयोवृद्ध शेतकरी कर्जापासून वंचित...
50 ते 65 वयोगटातील अनेक वयोवृद्ध शेतकरी मोठ्या जोमाने शेती करतात. या शेतकऱ्यांना बँकांनी पिक कर्ज नाकारलेले आहे. त्यामुळे कोरोनाच्या बिकट परिस्थितीत वयोवृद्ध असलेले शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. याकडे शासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी देखील केली जात आहे.
हेही वाचा - "मराठा आरक्षण टिकलं पाहिजे, मिळालं पाहिजे आणि त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे"