बीड- देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) स्पर्धा परीक्षेत बीडनेही गुणवत्तेची मोहोर उमटविली आहे. मंदार जयंत पत्की या विद्यार्थ्याने युपीएससी परीक्षेत देशामध्ये 22 वा क्रमांक पटकाविला.
मंदार पत्कीने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी युपीएससीमध्ये देशातून 22 वा येण्याची कामगिरी केली आहे. मंदारचे बीड येथील संस्कार विद्यालयात शालेय शिक्षण झाले आहे. त्याने बीडमध्ये पॉलिटेक्निक व अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. मंदारचे वडील महावितरण विभागातून सेवानिवृत्त झालेले आहेत.
नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर आज जाहीर करण्यात आली आहे. युपीएससी परीक्षेत वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी मंदारने उल्लेखनीय यश मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, नागरी सेवा परीक्षा 2019 चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून आज जाहीर करण्यात आला झाला आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण 829 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.