बीड - जिल्ह्यातील गेवराई येथील वखार महामंडळाच्या धान्य गोदामाला सोमवारी पहाटे अचानक आग लागली. या आगीमध्ये व्यापारी व शेतकऱ्यांनी गोदामात साठवलेले शेकडो क्विंटल धान्य जळून खाक झाले आहे. अग्निशमन विभागाचे जवान व पोलिसांनी आग आटोक्यात आणली. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या आगीत साधारणत: १५ ते १८ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वखार महामंडळाच्या धान्य गोदामाला अचानक आग लागली असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. ही घटना सोमवारी पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान घडली. याच वेळी माजलगाव, गेवराई व बीड येथील अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. इतर तालुक्यातून अग्निशमन विभागाच्या विभागाच्या गाड्या वाहने येईपर्यंत आगीमध्ये मोठ्या प्रमाणात धान्य जळून खाक झाले होते.
या आगीमध्ये जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन विभागाचे जवान अद्यापही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. वखार महामंडळाच्या गोदामात विज जोडणी नसतानाही आग लागली कशी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला असून, त्या दिशेने गेवराई पोलीस तपास करत आहेत