बीड - निजाम काळात शेती सिंचनाचा उत्तम नमुना असलेली बीडची खजाना बावडी गेल्या ४५० वर्षात दुसऱ्यांदा कोरडी पडली आहे. बीडच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारी खजाना बावडी आटल्याने इतिहासकार डॉ. सतीश साळुंके यांनी चिंता व्यक्त केली आहे. ही बाब गंभीर असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी २०१५ च्या दुष्काळामध्ये खजाना बावडी ४५० वर्षात पहिल्यांदा कोरडी पडली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
२०११ नंतर अपवादात्मक एखादे दुसरे वर्ष सोडले, तर सातत्याने बीड जिल्हा दुष्काळाशी सामना करत आहे. जिल्ह्यातील जनतेचा व दुष्काळाचा सुरू असलेला पाठशिवणीचा खेळ थांबता, थांबत नाही. दुष्काळाची भयानकता प्रचंड असल्याचा प्रत्यय बीड जिल्ह्यामध्ये येत आहे. जिल्ह्यातील १ हजार ४०४ गावांपैकी साडेपाचशे गावांमध्ये प्रचंड पाण्याची टंचाई आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या सगळ्या परस्थिती बरोबरच बीड शहरापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेली निजामकालीन खजाना बावडी मागील ४५० वर्षांत दुसऱ्यांदा कोरडी पडली आहे. याबद्दल बीड येथील इतिहासकार डॉ. सतीश साळुंके म्हणाले की, यापूर्वी २०१५ - १६ मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा खजाना बावडी ४५० वर्षात पहिल्यांदा कोरडी पडली होती. त्यानंतर आता २०१९ दुष्काळामध्ये दुसऱ्यांदा कोरडी पडत आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.
काय आहे खजाना बावडी
बीडच्या ऐतिहासिक वैभवात भर टाकणाऱ्या खजाना बावडीबाबत सांगताना इतिहासकार डॉ. सतीश साळुंके यांनी सांगितले की, मध्ययुगीन काळातील सिंचनाचा उत्तम नमुना म्हणून खजाना म्हणून बावडीकडे पाहिले जाते. अहमदनगरच्या सलामत खान या निजाम राजाच्या काळात या विहिरीवरून १ हजार एकर जमीन कुठल्याही इलेक्ट्रिसिटीशिवाय पाण्याने भिजवली जात होती. बालाघाटाच्या पर्वत रांगांमधून मोठ्या प्रमाणात या खजाना बावडी मध्ये पाणी येत होते.
धुळे - सोलापूर महामार्गावर बीड शहराच्या दक्षिणेला असलेली खजाना बावडी अनेक वर्षे पर्यटकांचे आकर्षण राहिलेली आहे. मात्र, मागच्या पाच वर्षात पडत असलेल्या भीषण दुष्काळामुळे सगळे चित्रच बदलून गेले आहे. ही बाब सर्वसामान्य माणसांना गंभीर वाटत नसली तरी भूजल भागातील तज्ज्ञ व इतिहासकारांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. खजाना बावडी च्या चार ते पाच किलोमीटर परिसरातील पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता असल्यामुळे खजाना बावडी कोरडी पडत आहे.