बीड - 'लोकनेते गोपीनाथ मुंडे सूतगिरणी केज'च्या संचालकपदी बोगस स्वाक्षरी करून निवडले असल्याचा आरोप करत तक्रारदार गणपती सोनप्पा कांबळे यांनी याआधी न्यायालयात याचिका दाखल केली होती. कांबळे यांच्या याचिकेवर केज दिवानी न्यायालयाने आज (बुधवारी) निकाल दिला. न्यायालयाने सूतगिरणीचे अध्यक्ष डॉक्टर विजयप्रकाश ठोंबरे व भाजप आमदार संगीता ठोंबरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजप आमदार संगीता ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल होत असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आमदार ठोंबरे यांनी दोन वर्षांपूर्वी केज येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने नवीन सूतगिरणी उभारली आहे. सूतगिरणीचे काम अद्याप सुरू आहे. याच सूतगिरणीवर संचालक म्हणून नेमलेल्या एका व्यक्तीच्या बोगस स्वाक्षऱ्या केल्याचा ठपका आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मागील काही महिन्यापासून फिर्यादी गणपती सोनाप्पा कांबळे हे केज पोलीस ठाण्यात खेटे घालत होते. "लोकनेते गोपीनाथ मुंडे सूतगिरणीवर मला संचालक म्हणून घ्या, असे मी कधीही मागणी केली नसताना माझे नाव संचालक म्हणून आले कसे?" असा प्रश्न कांबळे यांनी उपस्थित केला आहे. कांबळे म्हणाले, माझ्या स्वाक्षऱ्यादेखील बोगस आहेत. हे मी वारंवार सांगितले आहे. तसेच जेव्हा पोलीस गुन्हा दाखल करुन घेत नाहीत म्हटल्यावर मी न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. केज येथील पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद केला जाईल.
भाजप आमदार संगीता ठोंबरे यांच्याबद्दल -
भाजप आमदार संगीता ठोंबरे या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यांनी आपली नोकरी सोडून २०१४ साली राजकारणात आल्या व मोदी लाटेत निवडून आल्या. त्यांचे पती डॉ. विजप्रकाश ठोंबरे हे लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे चेअरमन आहेत.