बीड- चक्क आठ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने राज्य सरकारने मंदिरे खुली केली. बीडमध्ये कंकालेश्वर मंदिर येथे भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. मंदिर समितीच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे नियम पाळून भाविकांना दर्शन घेण्याची व्यवस्था केलेली असल्याचे कंकालेश्वर मंदिर संस्थानचे संजय पुजारी यांनी सांगितले. मंदिर उघडण्याचा सर्वाधिक आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर झळाळत होता. तर गुरव समाज संघटनेच्या वतीने मंदिर उघडल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार देखील मानले.
हेही पाहा -मनमाडमधील सर्व धार्मिक स्थळे उघडली, धर्मगुरुंनी मानले सरकारचे आभार
बीड शहरात महादेवाचे कंकालेश्वर मंदिर हे पुरातन मंदिर आहे. दरवर्षी पाडवा निमित्ताने अनेक भाविक भक्त महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. मागील आठ महिन्यापासून कोरोनाच्या संकटामुळे मंदिरे लॉकडाऊन होती. अखेर सोमवारी कंकालेश्वर मंदिर राज्य शासनाच्या आदेशानंतर खुले झाले आहे. भाविकांनी यावेळी सोशल डिस्टन्सचा नियम पाळून भक्तिभावाने दर्शन घेतले.
वैद्यनाथ मंदिर देखील झाले खुले-
बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिरावर दर्शनासाठी भाविक आले होते. वैद्यनाथ मंदिर संस्थानच्या वतीने ठिकठिकाणी बॅरिकेट्स उभारण्यात आल्या असल्याची माहिती वैजनाथ देवल कमिटीचे राजेश देशमुख यांनी सांगितले. सर्व नियम पाळून आणि खबरदारी घेऊन भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येत होता.
हेही पाहा -दिलासादायक..! मुंबईतील चार विभागातील रुग्ण दुपटीचा दर 400 दिवसांच्या पार