बीड - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत दाखल झालेले बीडचे जयदत्त क्षीरसागर शिवसेनेच्या कोट्यातून रविवारी मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. जयदत्त क्षीरसागर यांना आरोग्य खाते मिळणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, अशी चर्चा असली तरी त्यांच्या कार्याकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र त्यांच्याकडून सध्यातरी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
जयदत्त क्षीरसागरांनी राष्ट्रवादी का सोडली?
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात जाऊन भाजपला उघडपणे मदत केली. जिल्ह्यातील स्थानिक असलेले राजकीय घराणे म्हणून जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याने त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. पुतणे संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघावर उमेदवारीसाठी दावा केल्यानंतर राष्ट्रवादीमधून काही ज्येष्ठ मंडळींनी संदीप क्षीरसागर यांना आतून पाठबळ दिले. याचा परिणाम जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीवर नाराज झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
शिवसेनेच्या कोट्यातून रविवारी जयदत्त क्षीरसागर मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. क्षीरसागर यांना आरोग्य खाते मिळणार असल्याचीही जोरदार चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपद जवळपास निश्चित मानले जात आहे. बीड जिल्ह्यातील राजकारण बदलत आहे. जुन्या शिवसैनिकांचा जयदत्त क्षीरसागर यांनी विश्वास संपादन केला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांचे नेतृत्व जुन्या शिवसैनिकांनादेखील मान्य असल्याचे यापूर्वीच सार्वजनिक कार्यक्रमांमधून स्पष्ट झालेले आहे.