बीड- कोरोनाच्या या भीषण महामारीतून बचाव करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज आहे. यासाठी जिल्ह्यातील 5 लाख नागरिकांना होमिओपॅथी औषधाचे मोफत वाटप करणार असल्याची माहिती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.
काकू नाना प्रतिष्ठान व सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात शनिवारी करण्यात आली. याला आयुष मंत्रालयाचेही सहकार्य लाभले आहे.
आज सबंध देश अदृष्य शत्रूशी लढतो आहे. ही बिकट परिस्थिती निघून जाईल, मात्र संकटाच्या काळात एक दुसऱ्याला मदत केली पाहिजे. या भावनेतून औषधे वाटप करत आहोत, असे जयदत्त क्षीरसागर म्हणाले. होमिओपॅथी औषधे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करतात, म्हणून आपण बीड जिल्ह्यातील 5 लाख नागरिकांना औषधे देत आहोत.
यावेळी प्राचार्य डॉक्टर अरुण भस्मे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, दिलीप गोरे, भाजपचे सर्जेराव तांदळे आदींची उपस्थिती होती.