बीड - माजी बांधकाम मंत्री तथा बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी बीड तालुक्यातील खडकी, तांदळवाडी, रोळासगाव या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या छावणीवर जाऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांनी दुष्काळाचा खंबीर राहुन सामना करण्याबाबत क्षीरसागर यांनी धीर दिला. यावेळी शेतकऱ्यांनी क्षीरसागर यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या.
आज जी बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आहे, तीच परिस्थिती कायम राहील असे नाही. येणाऱ्या काळात पाऊस पडतच असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या धैर्याने व खंबीर राहून दुष्काळाचा सामना करावा असे क्षीरसागर यांनी यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले.
बीड जिल्ह्यातील काही तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. चारा छावण्या उभारल्या तरी चारा आणायचा कुठून असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मैलो-मैल पायपीट करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी भागात शनिवारी माजी मंत्री तथा बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी दुष्काळी भागात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आपली कैफियत क्षीरसागर यांच्यासमोर मांडली.
या दुष्काळात शेतकऱ्यांनी खंबीर राहून मात करण्याची गरज आहे. सध्या असलेली दुष्काळी परिस्थिती फार काळ राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने पुन्हा उभा राहण्यासाठी प्रयत्न करावेत. बीड विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी आपल्या सोबत कायम राहीन. शेतकर्यांचे, शेतमजुरांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम मी समर्थपणे केलेले आहे. यापुढे देखील करणार आहे, असा शब्द उपस्थित शेतकर्यांना आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी या वेळी दिला.
जिल्हा प्रशासनाकडून छावणीवरील शेतकऱ्यांच्या जनावरांना सुविधा वेळेवर दिल्या जातात का? याबाबतची विचारपूसदेखील क्षीरसागर यांनी यावेळी केली.