बीड- जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र नारायण गड येथे शुक्रवारी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. 'जय हरी विठ्ठल'च्या जयघोष करत मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या हस्ते मध्यरात्री 12:5 मिनिटांनी महापूजा झाली. यावेळी येथील ग्रामस्थ बळीराम गवते, नवनाथ काशीद यांची उपस्थिती होती.
सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत दहा हजाराहून अधिक भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. बीड जिल्ह्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात दिंड्या नारायणगडावर आल्या आहेत.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने नारायणगडावर भजन कीर्तन व इतर आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. शुक्रवारी दिवसभर विविध भागातून भाविक नारायणगडावर येत आहेत. हजारो भाविक दर्शनासाठी रांगेत उभे राहिले आहेत. नारायणगडावर आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणारे कीर्तन हे चक्री कीर्तन असल्याचे येथील ग्रामस्थ व भाविक बळीराम गवते यांनी सांगितले.