बीड - बीड शहरातील जालना रोडवरील एका खासगी रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये गुरूवारी सायंकाळी एक पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना कळताच बीड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
ते अर्भक नेमके कोणाचे?
बीड शहरातील जालना रोडवर वीर रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये गुरुवारी सायंकाळच्या वेळेला मृतावस्थेत पडलेले पुरुष जातीचे एक अर्भक आढळून आले. या घटनेची माहिती तात्काळ बीड शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित सर्व प्रकरणाची पाहणी केली आहे. ते अर्भक नेमके कोणाचे आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.
बीड जिल्ह्यात खळबळ-
मात्र प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार गुरुवारी सायंकाळच्या वेळी एक महिला सोनोग्राफी करण्यासाठी वीर रुग्णालयात आली होती. त्यानंतर ती काहीवेळ रुग्णालयात बसली होती. त्यानंतर टॉयलेटमधून बाहेर निघाल्यानंतर ती महिला थेट घरी निघून गेली. असेही सांगण्यात येत आहे. या प्रकरणात त्या अर्भकाची नेमकी आई कोण? हे आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही. मात्र याचा तपास बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
टॉयलेटमध्ये सापडलेले ते अर्भक किती दिवसाचे आहे. याबाबत अस्पष्टता असून आरोग्य विभागातील तज्ञांकडून तपासणी झाल्यानंतरच त्या अर्भका बाबतची सविस्तर माहिती समोर येणार आहे. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई सुरू आहे.
हेही वाचा- विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहिल - बाळासाहेब थोरात