बीड - पाटोदा तालुक्यातील वडझरी येथील प्राथमिक आश्रम शाळेवरील शिक्षकांना फेब्रुवारी 2020पासून आतापर्यंत वेतनच मिळालेले नाही. वेतन मिळत नसल्याने आम्हा शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे सांगत शिक्षकांनी बुधवारपासून समाजकल्याण कार्यालय, बीड येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षक मुला-बाळांसह आंदोलनाला बसले आहेत.
'आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास'
समाजकल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात वडझरी येथील प्राथमिक आश्रम शाळेचे शिक्षक रेखा लोंढे, डी. एस. बांगर, डी. आर. सानप, एस. एम. जायभाय यांनी म्हटले आहे, की सहायक आयुक्त समाजकल्याण बीड यांच्याकडे आम्ही आमच्या वेतनाच्या संदर्भाने वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. एवढेच नाहीतर पत्रव्यवहार करूनदेखील फेब्रुवारी 2020 ते आजपर्यंतचे वेतन आम्हाला मिळालेले नाही. तसेच सातव्या वेतन आयोगाचे फरक रक्कम व रोखीचा पहिला हप्ता अद्यापही आम्हाला प्राप्त झालेला नाही. एकंदरीतच या सगळ्या प्रकारामुळे आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास शिक्षकांना गेल्या अनेक महिन्यापासून करावा लागत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
'उपासमारीची वेळ'
आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष घालून आमची मागणी मान्य करावी. जोपर्यंत प्रशासन आमच्या मागण्या मान्य करणार नाहीत, तोपर्यंत आम्ही आमच्या कुटुंबासह बीड शहरातील समाजकल्याण कार्यालयासमोरील आंदोलन मागे घेणार नाहीत, अशी भूमिका आश्रम शाळेवरील शिक्षकांनी घेतली आहे.