बीड- जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही. मात्र, भविष्यात जर या संदर्भात बिकट परिस्थिती निर्माण झाली, तर बीडच्या आरोग्य विभागाने एक 'बी प्लॅन' तयार केला आहे. त्यानुसार ६५० रुग्णांवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकाच वेळी उपचार करता येणार आहे. आणि त्यासाठी लागणाऱ्या खाटांची व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
कर्मचाऱ्यांचा थेट रुग्णांशी संबंध येत असल्यामुळे आरोग्य विभागाने आपली यंत्रणा सतर्क केली आहे. भविष्यात परिस्थिती बिघडून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य विभागाने नियोजन केलेल्या 'बी' प्लॅनमध्ये अंबाजोगाई, परळी, माजलगाव, आष्टी, पाटोदा यासह इतर ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे. शिवाय खबरदारी म्हणून जिल्ह्याच्या सिमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला जिल्ह्यात येणे अशक्य होणार आहे.
जिल्ह्यातील चारही सिमेवर आरोग्य विभागाचे कर्मचारी नेमलेले आहेत. जर कोणी संभाव्य कोरोना रुग्ण आढळून आला तर त्याची तात्काळ तपासणी करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाकडून ४० कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्व जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज घडीला जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे, नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. प्रशासन सांगत असलेल्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन डॉक्टर अशोक थोरात यांनी केले आहे.
हेही वाचा- लॉकडाऊनमध्ये मदतीसाठी सरसावले आष्टी प्रशासन; गरजू आणि अडकलेल्यांची केली मदत