बीड- भाजीमध्ये मीठ टाकले नाही या क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीची हत्या केली आहे. शेलगावथडी शिवारात ही धक्कादायक घटना घडली असून रंजना वसंत जाधव, असे मृत पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- जामिया हिंसाचार: विद्यार्थ्यांना मारहाणप्रकरणी चौकशी सुरू; पोलिसांवर कारावाईची कुऱ्हाड
रंजना वसंत जाधव (वय २३, रा. सुतारवाडी ता. मुळशी जि. पुणे, हल्ली मुक्काम शेलगावथडी ता. माजलगाव) आणि वसंत हे दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपूर्वीपासून शेलगावथडी येथील एका शेतात राहतात. झाडे तोडून त्यापासून कोळसा तयार करायचा व तो विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे.
दरम्यान, भाजीत मीठ नसल्याच्या कारणावरुन वसंतने रंजनाशी वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की वसंतने रंजनाची हत्या केली. घटनेनंतर वसंत फरार झाला आहे.
गुरुवारी सकाळी खुनाची घटना समोर आली. याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरिक्षक संतोष पाटील यांनी भेट दिली. पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. आरोपी फरार असून याप्रकरणी अधिक तपास उपनिरिक्षक सोमनाथ नरके करत आहेत.